Issue Description


Authors : सरोज एन. शिंगाडे व जगदिश्वर मेश्राम

Page Nos : 186-190

Description :
आंबेडकरवादाचे पुरस्कर्ते, साम्यवादाचे प्रवर्तक, लोकसाहित्यिक, लोकशाहीर, प्रतिभावंत लेखक अण्णा भाऊ साठे हे मराठी साहित्यातील एक बहुआयामी व्यक्तिमत्व होय. त्यांचे लेखन हे खर्या अर्थाने फुले, आंबेडकरी सामाजिक समतेच्या विचाराने प्रभावित होते. ‘जग बदल घालुनी घाव, गेले सांगूनी मला भिमराव’ या प्रमाणे आयुष्यभर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना त्यांनी स्वतःला अर्पण केले. त्यांचे साहित्य सामाजिक समतेचा विचार मांडणारे होते. तळागाळातील लोकांचे साहित्य त्यांनी मांडले असून एक संवेदनशील कलावंत म्हणून त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. जो समाज साहित्याच्या मुख्य प्रवाहापासून दूर होता त्या समाजाला त्यांनी साहित्याच्या केंद्रस्थानी आणण्याचे कार्य केले. दलित, शोषित, वंचित, पिडित, गावकुसाबाहेरील, चोर, दरोडेखोर, वेश्या, मुरळी, जोगतीन यासारख्या सामाजिक जीणं नाकारलेल्या लोकांना त्यांनी आपल्या साहित्यात नायकपण दिले. अण्णाभाऊंचा पिंड मार्क्सवादी असल्यामुळे साम्यवादाचा त्यांच्या जीवनावर प्रभाव होता. असे असले तरी त्यांच्या जगण्यात जन्माचे जे दलितपण होते त्या दलितपणामुळेच पुढील काळात ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक समतेच्या आंदोलनाचे पाईक ठरले. त्यांच्या साहित्याचा पूर्वार्ध जरी मार्क्सवादी असला तरी उत्तरार्ध हा आंबेडकरवादाने भारलेला आहे. बुद्धाची शांतता, फुलेंची सामाजिक क्रांती, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मानवतावादी, विषमता विरोधी , समतेचे लढे हे त्यांच्या साहित्याचे प्रेरणास्थान होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीचा त्यांच्या संवेदनशील मनावर खोलवर प्रभाव पडला. या प्रभावामुळेच पुढे त्यांनी आपली साहित्यनिष्ठा आंबेडकरवादास अर्पण केली. या आंबेडकरवादी विचारांच्या उर्जेच्या प्रभावाने त्यांनी झपाटून तळागाळातील, गावकुसाबाहेरील लोकांचे जगणे जगाच्या समोर मांडले. ‘जे जगले, अनुभवले तेच मांडले. मी ठरवून काही लिहित नाही’ हे त्यांचे विचार त्यांच्या दलितपणाच्या असण्यात, जगण्यातच दिसते. या दलितपणाच्या जाणीवेमागे एक विचार आहे तो विचार म्हणजे ‘आंबेडकरवाद’ होय. हा आंबेडकरवाद डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर अधिकच दृढ झाला. आंबेडकरवाद हा त्यांच्या जीवनाचा श्वास आणि ध्यास बनला. यातूनच अण्णा भाऊंनी आंबेडकरवादी साहित्याची निर्मिती केली. या आंबेडकरवादाचा त्यांच्या साहित्यावर पडलेला प्रभाव व त्यातून निर्माण झालेले साहित्य याचा अभ्यास प्रस्तुत ‘‘अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावरील आंबेडकरवादाचा प्रभाव’’ या शोधनिबंधात मांडलेला आहे.

Date of Online: 30 May 2023