Authors : कैलास रामचंद्र भंडारकर
Page Nos : 533-539
Description :
ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारताला मुक्त करण्यासाठी भारतीयांनी ब्रिटिश विरोधात अनेक आंदोलने केली. त्यापैकी 16 आॅगस्ट 1942 चे चले जाव आंदोलना संदर्भात चिमूर क्रांती भारतातच नव्हे तर जग प्रसिध्द बाहे. 8 आॅगस्ट 1942 च्या मुंबई येथील गवालीया टॅंक मैदानावर महात्मा गांधींनी आपल्या भाषणातून चले जाव आंदोलनाचा दिलेला नारा व ‘करा अथवा मरा’ विधानाने भारतीयांची मने पेटून उठली. याचे पडसाद चंद्रपूर जिल्हयातील चिमूर येथे उमटल्यावाचून राहिली नाही. चंद्रपूर येथे या आंदोलनाला प्रतिसाद मिळताच ब्रिटिश सरकारने चंद्रपूरच्या जेष्ठ नेत्यांना अटक केली. त्याच्या निषेधार्थ चिमूरला 16 आॅगस्ट 1942 रोजी मोर्चा काढण्यात आला. त्यावर पोलीसांनी गोळीबार केला.त्यात चिमूरचे तीन क्रांतीकारक शहीद झाले. त्यामुळे संतप्त जमावाने विश्रामगृहाला आग लावली. त्या आगीत दोन ब्रिटिश महसूल अधिकारी भस्मसात झाले. याच जमावाने सर्कल इन्स्पेक्टर व हेडकाॅंन्सटेबल या पोलीस अधिका-याना ठार मारले. याची वार्ता चंद्रपूरच्या कलेक्टरला लागताच त्यानी चिमूरला पोलीस फोर्स व लष्कर पाठविले. या लष्कराने चिमूरची लूट करून हजारो स्त्रि- पुरूषांना तुरूंगात डांबले त्यानंतर स्त्रियांवर अत्याचार व बलात्कार केले. अशावेळी न डगमगता दादीबाई बेगडे व प्रभावती घरोटे या हिम्मतवान महिलांनी अनेक स्त्रियांना आश्रय देऊन रक्षण केले. तसेच घडलेल्या प्रकाराची माहिती जिल्हाधिका-याला दिली. तरीही देखील ब्रिटिश सरकारने चिमूरकरांवर खटले भरून फाशीच्या, जन्मठेपेच्या व सश्रम कारावासाच्या आणि स्थानबद्वतेच्या शिक्षा दिल्या.
चिमूर क्रांतीसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना जबाबदार धरून त्याना चंद्रपुरला अटक करून जेल मध्ये ठेवले. चिमूर व आष्टी येथील क्रांतीकारकांना झालेल्या शिक्षा व स्त्रियांवर झालेले अत्याचाराच्या चैकशीसाठी मध्यप्रांतातील अनेक काॅंगे्रसा पुढा-यानी प्रयत्न केले. तेंव्हा कुठे चिमूर मधील स्त्रियांवरील अत्याचार व बलात्काराची चौकशी करण्याची परवानगी मिळाली. त्यानुसार नागपूरच्या तीन भगिनींनी डाॅ. वझलवार यांच्या मदतीने बलात्कारी स्त्रियांची तपासणी करून त्यांच्या मुलाखती व जबानी घेतल्या त्यात अनेक तरूण, गर्भवती व वृध्द स्त्रियांवर बलात्कार झाल्याचे सिध्द झाले.
चिमूरवासियांवर झालेला अत्याचार व शिक्षा बाबत प्रा. भन्साळी यांनी पत्रक काढले त्यावर सरकारने बंदी घातली व प्रा. भन्साळीना अटक केली. तेंव्हा त्यांनी तुरूंगातच आमरण उपोषण सुरू केले. शेवटी डाॅ. खरे यांनी गव्हर्नर व भन्साळी यांत तडजोड घडवून आणली नंतर भन्साळीनी उपोषण सोडले.
फाशीची शिक्षा झालेल्या क्रांतीवीरांना कायदेशीर मदत करण्यासाठी डाॅ. खरेंच्या अध्यक्षतेखाली फाशी निवारण समिती गठीत करण्यात आली. तर समितीच्या अध्यक्षा सौ.अनसूयाबाई काळे यांना करण्यात आले. या समितीने कोर्टात खटले चालविण्यासाठी निधी गोळा करून खटले चालविले. शेवटी 19 आॅगस्ट 1945 पर्यंत गव्हर्नरने सर्वांच्या फाशीच्या शिक्षा रद्द केल्या. परिणामी चिमूर व पर्यायाने चंद्रपूर जिल्हयातील जनता आनंदित झाली.